Friday, June 22, 2012

by Samirsinh Vaidya-Dattopadhye 

हरि ओम




ह्या वर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव शनिवार, दिनांक ७ जुलै २०१२ रोजी सद्‌गुरु श्रीअनिरुद्ध उपासना ट्रस्टतर्फे श्रीहरिगुरुग्राम, शासकीय वसाहत, खेरवाडी पोलीस स्टेशन जवळ, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे आयोजित केलेला आहे. हा उत्सव सकाळी ९:०० पासून रात्री ९:३० पर्यंत साजरा करण्यात येणार आहे. सर्व श्रद्धावानांना या सोहळ्यात सहभागी होऊन आपल्या लाडक्या सद्‌गुरुंच्या दर्शनाचा लाभ घेता येईल.



गुरुपौर्णिमा उत्सवाची थोडक्यात रुपरेखा -



१) परमपूज्य सद्‌गुरु बापू, परमपूज्य नंदाई व परमपूज्य सुचितदादा यांचे श्रीहरिगुरुग्राम येथे आगमन होईल.

२) आगमनाच्या वेळेस सद्‌गुरुंचे औक्षण व पुष्पवृष्टी होईल.

३) स्टेजवर श्रीदत्तात्रेयांची मूर्ती आणि श्रीनृसिंहसरस्वतींच्या पादुकांची स्थापना होईल. परमपूज्य सद्‌गुरु बापू, नंदाई व सुचितदादा स्वत: पादुकांचे पूजन करतील.

४) सद्‌गुरुंचे स्टेजवर आगमन झाल्यानंतर श्रीअनिरुद्ध चलिसा पठण होईल. तसेच दर एक तासाने हे पठण केले जाईल.

५) प्रत्येकवेळी श्रीअनिरुद्ध चलिसा पठण झाल्यानंतर सुशोभित केलेल्या कावङींमधून स्टेजवर उदी आणली जाईल व तिला सद्‌गुरुंचा हस्तस्पर्श करुन घेण्यात जाईल. त्यानंतर हा उदीचा प्रसाद प्रत्येक श्रद्धावानासाठी उपलब्ध असेल.

६) स्टेजवरील दत्तात्रेयांच्या मूर्तीवर संपूर्ण दिवस 'ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः' या मंत्राचा जप करत निवडक श्रद्धावानांकडून तुलसीपत्र अर्पण केले जाईल.

७) श्रीअनिरुद्ध चलिसाचे पहिले आवर्तन झाल्यावर "साईराम जय जय साईराम..." हा गजर सुरु होईल व रामनाम वहीच्या लगद्याने बनविलेल्या इष्टीका डोक्यावर घेऊन सद्‌गुरुतत्वाच्या स्तंभाला श्रद्धावान प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात करतील आणि त्याबरोबरच सद्‌गुरुंचे दर्शन घेऊ शकतील.

८) सकाळी ९.०० वाजता श्रीत्रिविक्रम महापूजन सुरू होईल, ज्याचा लाभ श्रद्धावान संपूर्ण दिवस घेऊ शकतील.

९) त्याचप्रमाणे सकाळी सुशोभित केलेल्या पालखीत परमपूज्य सद्‌गुरु बापूंच्या चरणमुद्रा विराजमान केल्या जातील. तसेच परमपूज्य सद्‌गुरु बापूंनी सकाळी पूजनाच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वतींच्या पादुकांवर घातलेल्या अभिषेकाचे जल एका गढूमध्ये ठेवून ते ह्या पालखीत ठेवले जाईल. ही पालखी संपूर्ण दिवस वाजत गाजत उत्सव क्षेत्रात फिरत राहील. प्रत्येक श्रद्धावानाला या पालखीच्या मिरवणुकीत सहभागी होऊन, चरणमुद्रांचे दर्शन घेता येईल.

१०) रात्री ९.३० नंतर महाआरती होईल.



श्रीत्रिविक्रम पूजन:

परमेश्वराची शुभंकर यंत्रणा आणि अशुभनाशिनी यंत्रणा, या दोन यंत्रणा बाह्य विश्वाप्रमाणे अंतर्विश्वातही, म्हणजे मानवी देहातही कार्यरत असतात. शुभाचे वर्धन आणि अशुभाचा नाश व्हावा यासाठी या यंत्रणा आमच्या जीवनात कार्यकारी रहाणे आवश्यक असते. सद्‌गुरुतत्व मानवाच्या जीवनात या दोन यंत्रणांना सक्रिय करण्याचे कार्य करते. या सद्‌गुरुतत्वाचा प्रतिनिधी आहे - श्रीत्रिविक्रम. सद्‌गुरुतत्वरूपी त्रिविक्रम स्वत:च्या तीन पदन्यासांमध्ये (अकारण कारुण्य, क्षमा आणि अनन्यभक्तीची स्वीकृति) अनन्यशरण असणार्‍या श्रद्धावानाचे दुष्प्रारब्ध नष्ट करून त्याच्या जीवनात आनंदवन फुलवतो.

सद्‌गुरुतत्वाच्या चरणांमध्ये ’सृजनचक्र’ आणि ’संहारचक्र’ असते. त्याच्या पदन्यासाबरोबर ही दोन्ही चक्रे गतिमान होतात, हिताचे सृजन आणि अहिताचा संहार होतो. दुष्प्रारब्ध कितीही खडतर असले, तरी ज्या क्षणी आम्ही त्रिविक्रमाला शरण जातो, त्याक्षणी त्रिविक्रमाचा ’पदन्यास’ आमच्या मनात सक्रिय होतो. अगदी आमचे पाप कितीही मोठे असले, तरी ते त्रिविक्रमाला आमच्या जीवनात प्रवेश करण्यापासून रोखू शकत नाही.

म्हणूनच श्रद्धावान गुरुपौर्णिमेला सद्‌गुरुतत्वाचा प्रतिनिधी असणार्‍या त्रिविक्रमाचे दर्शन घेतात, त्याचे पूजन करतात आणि त्याची प्रार्थना करून त्याला जीवनात येण्यासाठी आमंत्रण देतात. आमच्या जीवनात नित्य गुरुपौर्णिमा रहावी, अशुभाचा नाश होऊन सदैव शुभच व्हावे या भावाने गुरुपौर्णिमेस श्रद्धावान त्रिविक्रमाचे पूजन करतात आणि दोन हात - एक माथा म्हणजेच श्रद्धा - सबुरी - अनन्यता ही गुरुदक्षिणा त्रिविक्रमाच्या चरणी अर्पण करतात.



साईराम जप:

गुरुपौर्णिमा उत्सवातला हा महत्वपूर्ण भाग आहे. यात मध्यभागी एक स्तंभ उभा केलेला असतो. हा स्तंभ म्हणजे सद्‌गुरुतत्वाचा स्तंभ जो आमच्या जीवनाला स्थैर्य देतो. या स्तंभावर परमपूज्य सद्‌गुरु बापू, नंदाई व सुचितदादा ह्यांच्या तसबीरी असतात. त्याचप्रमाणे या स्तंभावर श्रीवरदचण्डिका प्रसन्नोत्सवातील पूर्वावधूत कुंभ व अपूर्वावधूत कुंभही ठेवलेले असतात. प्रथम परमपूज्य सद्‌गुरु बापू, नंदाई व सुचितदादा या स्तंभाच्या भोवती रामनाम वहिच्या लगद्यापासून बनवलेल्या इष्टिका डोक्यावर घेऊन प्रदक्षिणा घालतात व नंतर श्रद्धावानांना या स्तंभाच्या भोवती प्रदक्षिणा घालण्याची संधी मिळते.

स्तंभाच्या भोवती प्रदक्षिणा घालताना पुढील गजर म्हटला जातो.

गजर - "साईराम जय जय साईराम, दत्तगुरु सुखधामा

अनिरुद्ध बापू सद्‌गुरुराया, कृपा करजो देना छाया

रमते राम आयोजी उदिया की गोनिया लायो जी"

जी इष्टिका विठ्ठलाने स्वतःच्या पायाखाली ठेवली तीच इष्टिका माझ्या डोक्यावर आहे हाच भाव ठेवून प्रत्येक श्रद्धावान प्रदक्षिणा घालतो आणि ह्या सद्‌गुरुचे चरण माझ्या हृदयात कायमचे स्थापन व्हावेत ही प्रार्थना करतो (किजै नाथ हृदय महॅं डेरा)...

No comments:

Post a Comment